शुक्रवार, १५ मार्च, २०१९

निकाल: पास - गुण: १००%



अंगणात आलेल्या चिमणीची चिव चिव ऐकू येते न येते; ती चिमणी दाणा खाते न खाते; नि लगेच भुरकन उडून जाते ... तसेच काहीसे सुरुची चे झालेले;

अगदी "नववधू प्रिया मी बावरते" असा आणि इतका नवीन संसार ... आता कुठे घर लावायला  सुरवात केलेली.  नवीन म्हणून का होईना पण नवरोबा पण साथ देत होते

अश्याच एके रविवारी हे लक्ष्मी-नारायण तुळशी बागेत गेलेले खरेदीला; आणि तेवढ्यात फोन, पुण्यात काही कामा निम्मत आलेली नवऱ्याची आई-आज्जी चार तासात भेटायला येतेय नवीन जोडप्याला.

नवऱ्याने थोडे हो - नाही करत फोन ठेवला आता उरलेल्या सगळ्या बेतावर पाणी पडणार. संध्याकाळी सारस -बाग, हॉटेल मध्ये जेवण, आणि मग सुजाता ची मस्तानी सगळ कॅन्सल करावे  लागणार आणि बायको पण चिडणार म्हणून त्याचा चेहरा आधीच उतरला...

शेवटी त्याने उरलेली थोडी बोहरी आळीतली खरेदी करावी आणि मग घरी यावे असे त्याला सुचवून म्हणजे जवळ जवळ ठरवूनच  तीने पटकन घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली.

सुरुची तशी छोट्या शहरातून आलेली असली तरी पुण्यातच शिकलेली, त्या मुळे पुण्याची तशी तिला माहिती त्यामुळे त्याला तिने घरी जाण्याविषयी काळजी न्हवती पण ती पुण्यात शिकलेली, नवीन विचारांची, मॉडर्न, स्वतः चे मत ठामपणे मांडणारी, मोकळी आणि  म्हणूनच त्याला हे आई-आज्जी प्रकरणचं टेन्शन आलेले आणि आता काय करणार म्हणून चक्रावलेला. सगळे नवीन तिला कसे जमणार म्हणून त्याचाच जीव खाली वर होत होता...

त्याने कसेतरी पटकन खरेदी केली आणि गेला घरी बिचारा...

घरी बघतो तर काय... घर उत्तम आवरलेले ... वरणभात, भाजी पोळी ,कोशिंबीर वैगरे सगळं सुग्रास स्वयंपाकाची तयारी  त्यात परत आई-आज्जी ला आवडणारा साजूक तुपातला शिरा पण. आणि हीच पुण्यातली मॉडर्न जीन्स आणि टॉप वाली मुलगी साडी नेसून, भाळी कुंकू लावून, केसांचा अंबाडा घालून, गळ्यात फक्त पण
ठशठशीत मंगळसूत्र, केसात फुल आणि हातात बांगड्या घालून तयार. सुरुची चे ते सात्विक आणि लाघवी रुपडं बघून हा तर स्तब्धच झाला कदाचित पुन्हा एकदा तिच्या प्रेमातच  पडला.

तेवढ्यात आई-आज्जी आली.

तिला वाकून नमस्कार, तिची विचारपूस, तिला काय हवे काय नको सगळे सुरुची एकटेच बघत होती. आई-आज्जी चा चहा, संध्याकाळचा दिवा, पूजा, पोथी वाचन, सगळे सगळे घडत होते आपोआपच. दोघेही छान गप्पा मारत होत्या, ती त्यांना आणि त्या तिला समजावून घेत होत्या.

आई-आज्जी ची गोड़, तिखट,आंबट ची पथ्थे, गोळ्या-औषधं तर सगळे तिला जणू माहितीच होते. ते सगळे बघून तर त्यालाच काहीच कळायला मार्ग न्हवता काय आणि कसे चाललेय ते? एकदा दोनदा तर त्यालाच त्याचा घरात नवीन आणि परके आहोत असे वाटले.

जेवण झालीत; अगदी फळं सुद्धा झालीत; आई-आज्जी च्या उशाशी तांब्या-भांडे पण ठेवले. हा इकडे बेडरूम मध्ये वाट बघतच बसला, आणि सुरुची मात्र आई-आज्जी च्या बाजूला झोपली सुद्धा.

सकाळी आई-आज्जी निघाल्या; निघताना नातं-सुनेला जवळ घेतले साडी-चोळी दिली आणि म्हणाल्या

"निकाल: पास -  गुण: १००%"

   

 




       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अडथळा

विजय - वर्गातल्या मोजक्याच हुशार मुलांमधला, मध्यम उंचीचा, गोरा, आणि मितभाषी मुलगा.  कुठल्याही स्कॉलर मुला मध्ये असणारे सगळे गुण ह्याच्या ...