मला भेटलेले संत
आपल्या महाराष्ट्राला खूप मोठी संत परंपरा लाभली आहे. संत तुकाराम, एकनाथ,चोखामेळा, रामदास, ज्ञानेश्वर,नामदेव,सावतामाळी,नरहरी सोनार,जनाबाई,मुक्ताबाई, गोरा-कुंभार इत्यादी; ही सगळी संत मंडळी त्यांच्या त्यांच्या काळात होऊन गेलेली, फार मोठी संत मंडळी; आणि त्यांनी समाजाला भरभरून दिले; त्या जोरावर समाज उभा राहिला, वाढला फळफळला. ह्या थोर मंडळी बद्दल मी बापडा काय ते सांगणार.
मी आज एका वेगळ्याच संत माहात्म्य बद्दल सांगणार आहे.
ते मला प्रथम कधी भेटले हे निश्चित सांगता येणार नाही; पण सुरुवातीला कधी रस्त्यावर, कधी दुकानात, कधी मुलांना बगिच्यात खेळायला घेऊन गेलेलो असताना, तर कधी अगदी सिनेमा गृहात सुद्धा भेटले आहेत मला... आणि जसे आचनाक कुठेहीभेटतं,तसे अचानक गायब सुद्धा होतं.
![]() |
मला भेटलेले संत |
मी आश्चर्यच्या धक्यातून आवारात नाही तोच त्यांची दिसण्याची, भेटण्याची वारंवारता वाढली; ते आता दिवसातून बराच वेळ बरोबर असतं; बोलत तर काहीच नसत फक्त मंद स्मित करत; कधी कधी मला ही पण शंका येई की ते माझ्या कडे बघूनच तसे करत कि ते तसेच दिसत; पण एक मात्र खरे कि ते मंद स्मित मला दिसले कि मला पण खूप हायसे वाटे आणि माझा पण पूर्णत्वाचा, समाधानाचा श्वास/उसासा बाहेर पडे. नंतर तर मला अगदीच सवय झाली त्यांची असे म्हणायला हरकत नाही.
मित्राला सांगितले तर त्याला आश्चर्यच वाटले की कोण हे असे वैरागी कि जे सिनेमा गृहात,मॉल मध्ये असे कुठेही दिसतात, भेटतात आणि अचानक गायब पण होतात. त्याला तर खात्री झालेली कि एकतर हा जादूटोणा आहे किव्हा मला वेड तरी लागले आहे; कारण आजच्या ह्या काळात ह्या सगळ्या गोष्टी अशक्यप्राय वाटतात.
पण पुढे एक दिवस आला; मला आश्चर्याचा धक्काच बसला मी त्यांच्याशी बोललो असे मला वाटले. मी फक्त "तुम्ही?" असे प्रश्नार्थक नजरेनेच विचारले आणि त्यांनी फक्त स्मित हास्य केले; शब्द ऐकू नाही आले पण मला ते "हो मी... कारण तू... म्हणून मी... " असे बोलले असे स्पष्टपणे जाणवले; "तुला हवे तोपर्यंतच मी आहे; तुला हवे तेव्हाच मी येतो आणि तुला नको तेव्हा निघून सुद्धा जातो... "
मी तर पूर्णपणे बुचकळ्यात पडलो; काहीच समजत न्हवते; डोक्याला कितीही ताण दिला तरीही त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजत न्हवता; मीच काहीतरी ऐकले; उगाचच आपला भ्रम झाला वैगरे वाटत होते; पण कुठेतरी वाटत होते कि ते खरे सांगत आहेत; पण शहानिशा करणार कशी; माझ्या आयुष्याची आता जवळ जवळ चाळीस वर्ष आलेली; आणि त्या इसमाला; त्या स्मित हास्याला मी कुठेच पाहिलेले जाणवत न्हवते. कुठेच दिसला न्हवता आजपर्यंत का? कुठे होता इतके वर्षे मग ?
नंतर त्यांचा ठाव ठिकाण शोधण्यापेक्षा त्यांची मला एवढी सवय झालेली होती कि काही कारणामुळे जर ते स्मित हास्य-ती व्यक्ती दिसली नाही कि मी त्यांचा शोध घ्यायचो आणि ते तर म्हणत कि मीच त्यांना बोलावतो आणि घालवतो सुद्धा.
मला कळायला मार्गच न्हवता पण नंतर जेव्हा ते कधीतरी म्हणाले कि "मी बरोबरच असतो.. आधी पण होतो ... " मग मात्र मी संभ्रमात पडलो. कळायला काहीच मार्ग नाही, मित्राला सांगितले तर तो म्हणाला तुझ्या वर पळत ठेवली जात असेल; तुझे कॉलेज मध्ये काही भानगड किव्हा आधी कुणाशी काही भांडण न्हवते ना !?! मित्राची एकंदर दिशा बघून हा हे किती गंबीर पणे घेतोय ते लक्षात आले आणि कुणाशीच काही बोलायचे नाही ते ठरवले पण मग ह्याचा पत्ता लागायचा कसा? शेवटी मग मी माझ्याच भूतकाळात जायचे ठरवले-अगदी अनोळखी सारखे-मी मलाच आरश्यात पाहत होतो-मी माझाच चित्रपट पाहत होतो...ज्याचा मी हिरो होतो.
त्या चित्रपटात खरे तर मी किती शहाणा अथवा बावळट होतो; कुठे, किती आणि कसे वागायला चुकलो वैगरे-वैगरे सगळे अगदी लक्ख प्रकाश सारखे समोर येत होते...पण तिथे कुठे हे संत माहात्म्य दिसत न्हवते. खूप विचार केला अगदी विचारानं मध्ये अखंड बुडून गेलो...भूतकाळात एकदा मन गेले कि जपून ठेवलेल्या आठवणी हसु आणतात तर नकोश्या आसू त्यामुळे भूतकाळातून लवकर बाहेर येणे महाकठीण काम...रात्रं न रात्रं जागा असायचो पण भूतकाळ मधल्या झालेल्या गोष्टी / प्रसंग सोडून काहीच आठवत न्हवते आणि हे संत महाशय तर बेपत्ताच!.
आणि...आणि एका रात्री अचानक मला तो "युरेका" चा क्षण गवसला... (मला ते संत माहात्म्य; कि कारुण्य माउली दिसली ... )
नदी चा उगम दिसला; सुरुवातीला तिचे पात्र लहान होते; उंचावरून धावत येत होती; पाणी कमी पण आवाज जास्त आणि वेग जास्त;त्या वेगामुळे जीवनदायिनी कमी आणि जीव घेणारी जास्त भासली... तसेच तर माझे होते... म्हणतात हा "उथळ पाण्याला खळखळाट फार".
मला जाणवलेलं, दिसलेलं फक्त माझं होत असे वाटे पण जेव्हा मी माझ्या मित्रांशी ह्या संदर्भात हितगुज केले तेव्हा लक्षात आले कि थोड्या फार फरकाने सगळ्यांचेच असे होते.
सुरुवातीला अनिश्चिते कढून निश्चितेकडे सरकतांना आपण अगदी "माय लाईफ-माय रूल्स" किंव्हा "लाथ मारेल तिथे पाणी काढेल" वैगरे गोष्टी बोलत असतो; आणि त्या मुळेच कदाचित बाहेर जेवायला जाताना माझ्या जोडीदाराने मला हवे असलेले कपडे नाही घातले तर मी रुसणार ; मी जोडीदारासाठी खूप करतो आणि तो किव्हा ती तसे काहीच नाही करत ची भावना ; त्या वरून रुसवे-फुगवे; त्या मुले जेवण तर राहतेच बाजूला पण तो जेवणाचा आनंद पण मिळत नाही. मुलांना कुठला ड्रेस चांगला दिसेल ; त्यांची शाळा कुठली क्लास कुठला; ते अगदी घरात सोफा कुठल्या रंगाचा घायचा ते गुंतवणूक कश्यात करायची ह्यातून मतभेत आणि त्यातून रुसवे-फुगवे. त्यात परत सासर-माहेरा फोडणी ती वेगळीच...
पण आता वयाची जवळ जवळ ४ दशकं उलटायची वेळ आली असताना नवरा किव्हा बायको "ठीक ! चालेल ." म्हणून आपल्या जोडीदाराच्या प्रस्तावास मान्यता पण देऊन टाकते. मग ती किव्हा तो म्हणतो सुद्धा: "आज-काल तू लागेचस माझं ऐकतोस किव्हा ऐकतेस - आढेवेढे नाही कि वाद नाही ". खरे तर त्याला ही आणि तिला ही माहिती असते कि परिस्थिती काही बदलणार नाहीये; पूर्व असू दे कि पश्चिम सभोवताल तेच राहणार आहे; त्यामुळे आहे हि स्तिथी स्वीकारणे आणि पुढे चालावे. पण हे शहाणपण वयाचा आकडा पुढे सरकत गेला कि येते; आधी म्हणजे साधारणतः तिशी पर्यन्त परिस्थिती समजावून न घेता मला काय हवाय; मी कसा आणि मीच कसा बरोबर आहे ; मलाच कसे जास्त कळते ; ह्यात सगळे लक्ष असते. पण मग जरा वय झाल्यावर समजते कि त्याचा काहीही उपयोग नाही; आणि परिस्थिती स्वीकारायला हवी. आणि एकदा का परिस्थिती स्वीकारली कि मग समोरच्याची आपल्याला नव्याने ओळख होते परिस्थिती जशी आहे तशी का आहे ह्याचे आकलन आपोआपच होते; आणि ट्याटू मार्ग काढून पुढे चालत जाणे हा आपल्या जीवनाचा आणि जगण्याचा मार्ग होतो. मुलांनी कमी मार्क्स मिळवले तर त्यांना नीट समजावून सांगणे होते पण ते मध्ये आपण नाही किव्हा आपण त्यांच्या जागी परीक्षेला जाणार नाही - ज्याचे त्याचे त्यालाच करावे लागते हे समजते ... जोडीदार आपल्याशी वागताना चुकला तर आपण सोडून देतो; आपण चुकलो तर मना पासून सॉरी म्हणून पुढे सरकतो आणि त्याला आपलेसे करून आपण त्याचा होऊन जातो
ह्या स्टेज ला नोकरीचे, पदोन्नती चे समीकरणं नसतात, खूप पैसे कमाईची घाई आणि इच्छा नसते , नवीन गाडी , नवीन घर नको असते मला काय हवे ह्या पेक्षा जोडीदार, मुले , आपले पालक म्हणतात तसे आपण करून मोकळे होतो - का? तर त्यांना आनंद मिळावा म्हणून.. इच्छा एकाच असते ह्या सगळ्या मागे कि जे आहे जसे आहे तसेच चालू राहू दे .
आता नदीचे पात्र विस्तीर्ण झालेलं असते ; पाणी आता संथ , शांत , असते पण खोल असते ; ती आता जीवनदायिनी,जीवन-धारणी झालेली असते
... आणि अश्या वेळी ते संत माहात्म्य भेटतात ... आपण एक दिवस आरश्या समोर उभे असतो; त्यात आपण आपल्यालाच बघत असतो ; आणि अचानक आपल्याला ते संत माहात्म्य दिसतात ; आणि नंतर जेव्हा जेव्हा आपण परिस्तिथी चा स्वीकार करून; त्या शांत सखोल आणि विस्तीर्ण पात्र असलेल्या नदी प्रमाणे असतो तेव्हा तेव्हा ते संत माहात्म्य दिसत असतात आणि स्मित हास्य करत असतात...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा