बसस्टॉप
सकाळी ९ ची वेळ, बस सुटण्याच्या तयारीत, पराग धापा टाकताच चढला.
गेले तीन महिने तो हेच करतोय; ह्याच बस ने नोकरीला जातोय. उण्या पुऱ्या ३ वर्षाचा अनुभव घेऊन पुण्याच्या मोठ्या कंपनी मध्ये लागलेला. आज उशीर होण्याचे कारण रात्री जरा जास्तच जागरण झाले मित्रांबरोबर. नेहमीचंच गर्दी. एव्हाना तो नेहमीच्या प्रवाशांना , आणि ते त्याला ओळखते झाले होते .
पण आज काहीतरी वेगळे होते त्याला जाणवत होते पण सांगता येत न्हवते. आज काय खास होते बरे ... आज त्याची नजर तिच्या वर पडली आणि पडली काय स्तिरावलीच ... ती बहुदा नवीनच कि जुनी पण आधी कधीही न दिसलेली, गव्हाळ पण गोऱ्यात झुकणारी , दिसायला अगदी साधी पण रेखीव, गर्दीत उठून न दिसणारी पण नीट बघितले तर मात्र सुंदरतेला सामान अर्थी ... काय नाव असावे तिचे हा प्रश्न त्याला भेडसावत होता ...
दुसऱ्या दिवशी त्याला ऑफिस ला जाण्याच्या घाई पेक्षा बस पकडायची घाई झालेली ... दिसली पुन्हा दिसली .. परत तेच... तसाच भारावला गेला तो... आणि मूग ती दिसताच गेली आणि तो हरवतच गेला ... ज्या दिवशी ती दिसली नाही कि तो बस चुकवायचा आणि त्याला बस चुकवायला लागली तर त्याची चिडचिड व्हायची ...
त्याला तिच्याशी बोलायचे होते पण असे अचानक कसे बोलणार आणि त्याही पेक्षा परत दिसलीच नाही तर.. म्हणून तो जास्त घाबरे. गर्दी मुळे कधी ती उभी तर कधी तो , कधी त्यांच्यात डझन भर माणसे ऊभी तर कधी अगदी मागे पुढे ... अश्यातच त्याला ती "उत्तरा" असल्याचे त्याला समजले ... त्याला वाटले नावाप्रानेच तिचे दिसणे ... पटकन लक्ष न वेधणारे पण सगळ्याच आयुष्याच्या प्रश्नांची उत्तर असणारी .
तिची निकट काढण्यासाठी तो इतरांना जागा देणे, स्टॉप आला कि मागे पुढे करणे वैगरे क्लुप्त्या करी ... एकदा तर त्यानेच तिला जागा पण दिली पण बोलणे झालेच नाही... करूच शकला नाही... करणार तरी काय.
उत्तरा ही त्याच्या साठी असा प्रश्न होता कि त्याने तो सोडवल्या शिवाय त्याच्या जीवनात राम नाही ...
एके दिवशी, ती बस मध्ये पुढे उभी होती आणि तो मागे. तिच्यात आणि त्याच्यात निदान अर्धा डझन तरी माणसे होती,पुढचा स्टॉप अजून बराच पुढे होता, आणि कंडक्टर अजून त्याच्या मागेच होता ... त्यामुळे पुढचा स्टॉप येई पर्यंत तरी काहीच हालचाल करता येणार न्हवती; त्यात गर्दी आणि ती त्याला पाठमोरी होती ... एकंदर सगळं प्रकार बघता त्याचा हिरमोडच झाला होता ... बस सिग्नल ला थांबली, बस चे इंजिन आणि ह्याचे डोके दोघेही सुरूच होते पण चालू असून बस हालत न्हवती आणि ह्याला काही मार्ग सापडत न्हवता... कासावीस झाला होता...
तेवढ्यात पुढे हालचाल झाली, सिग्नलाच काही माणसे उतरली आणि हा पुढे जाण्याआधी तिला जागाच मिळाली आणि तिच्या शेजारी जागा रिकामी होऊन सुद्धा आपल्या ऐवजी दुसऱ्या कुणाला बसायला मिळेल म्हणून ह्याचा अजूनच मूड गेला आणि "श्या!" असे मनातल्या मनात म्हणत आणि नशिबाला लाखोली वाहत ह्याने वैतागून मान दुसरीकडे वळवली.
तेवढ्यात आवाज आला "जरा थांबता का ? माझ्या बरोबर ते आहेत." आता काय? कोण? म्हणून मनाचा हिय्या करून पराग ने आवाजा च्या बाजूला परत मान हलवली ... आणि बघतो तर काय , उत्तरा ने सगळ्या बस मध्ये सगळ्या समोर पराग कडे बोट दाखवत दुसऱ्या इसमाला तिच्या बाजूच्या सीट वर बसायला मज्जाव केला होता आणि सांगितले होते कि तिच्या शेजारी बसायची जागा हि पराग साठी "राखीव" आहे.
आज त्याला वर्ष झाले, म्हणायला काहीच बदलेले नाहीये; बस तीच, प्रवासी तेच, तेच ड्राइवर आणि कंडक्टर, प्रवासी पण तेच, रोजचेच, फरक फक्त एवढाच कि पृथ्वीची सूर्याभोवती एक फेरी पूर्ण झालेली, तिची आणि त्याची अग्नी भोवती ७; त्याचे गणित त्याला सुटलं होतं; त्याला उमगलं होतं "उत्तरा" सूत्र आणि तिच्या गळ्यात होतं त्याच्या नावाचं मंगळ सूत्र.