रविवार, २० जानेवारी, २०१९

चहा की कॉफी !?!


चहा की  कॉफी ?



चहा की कॉफी ? तसा अगदी वरवर चा आणि साधा वाटणारा हा प्रश्न बघितलं तर गहन आहे. 

चहा की कॉफी हा प्रश्न आधी कोंबडी की अंडी  ह्या सारखा अनादीकाळा  पासून चालत आलेला नसला तरी बराच जुना आहे; निदान इतका तर नक्कीच कि ह्या चहा आणि कॉफी च्या आधी गूळ-पाणी होते ह्याचा सुद्धा लोकांना विसर पडला असेल. 

तर चहा आणि कॉफी हि पेयं कानामागून आलीत आणि  "तिखट" ऐवजी  "गोड" झालीत असे म्हणायला हरकत नाही; आणि हे कधीपासून तर भारतीय इंग्रजळ्या पासून... बाकी भारतीयांचं इंग्रजळणं हे जंगली घोड्याला पाळीव बनवण्या इतकंच पुण्य कर्म होतं हे अजूनही काही गोऱ्यांना  (तिकडच्या आणि इकडच्या सुध्दा) वाटते... असो.  तसा तो विषय वेगळा - तो कधी तरी घेऊ तूर्तास चहा की कॉफी... 

बाकी हा प्रश्न साधा पण उत्तर देणाऱ्या विषयी बरेच काही सांगून जातो; उत्तराने तर हवे असलेले पेयं  (अर्थात चहा किंव्हा कॉफी - ह्या पैकीच एक काहीतरी - उगाच वाचकांनी आपल्याला हवी असलेल्या इतर पेयांची अपेक्षा करू नयें) हवय हे समजते पण ते नक्की कसे हवय हे पण समजते. उदाहरणार्थ   "चहा !!" अस स्पष्ट उत्तर मिळाले तर समजावे कि चहा हा कडक आणि फक्कड हवा आहे आणि तशीच स्पष्टोक्ती कॉफी च्या बाबतीत झाली तर जरा "स्ट्रॉंग" हवी असा अर्थ असतो . 


Coffee or Tea
Tea or Coffee


चहा घेणारी व्यक्ती कधी कॉफी घेत नाही आणि कॉफी घेणारी चहा... जिथे लोक प्रसंगानुरुप दोघे घेतात त्या वरून त्यांना एका विशिष्ट शहराचे रहिवासी - अर्थात "पुणेरी" म्हणतात... कारण तिथला नियम- "फुकट ते पौष्टिक". 

बाकी खुद्द पुण्यात चहा मिळतच नाही, मिळते ते "अमृततुल्य" आणि अमृततुल्य ला चहा म्हणणे म्हणजे राजा-ला-रंक, साहेबा-ला-नौकर, आणि पॉलिटिशियन-ला-सेवक म्हणण्या सारखी दुर्बुद्धी असण्या सारखे आहे.... आणि ती तसे म्हणणारी व्यक्ती दुसऱ्या जगातून पुण्यात आलेली आहे; आणि पुण्यात आलेली आहे - अवतरलेली नाही  म्हणून पुणेरी नाही हे सिद्ध होते.   "दुसऱ्या जगातून"  ह्या साठी म्हणालो कारण पुण्यात "जगात" भारी असे "बरेचं" अमृततुल्य आहेत . 

अरेच्चा ती कॉफी मागेच राहिली की   - 

हो  "ती" कॉफी आणि "तो" चहा... माणसांचे खरेतर, बाई आणि माणूस असे वर्गीकरण न करता चहा आणि कॉफी असेच करावे असे वाटते  - एकतर  चहा चे कॉफी सारखे, कॅपचिनो, एक्सप्रेसो,लाटे,फिल्टर  वैगरे असे विविध प्रकार नसतात; ती कोल्ड पण असते पण  तो गरमच (आणि तसाच चांगला लागतो.); बरं त्याच्या कडे तिच्या सारखी वस्र विविधता नसते; तो लिहायला आणि वाचायला सुद्धा सोपा; तिला वाचायचे म्हणजे परिश्रमच. दुसरे दोघांचे  मूळ स्वभावच वेगवेगळे. उदाहरणार्थ : एखाद्या व्यक्ती ला शिंक आली आणि त्या व्यक्ती ने आजूबाजूचा ४ ते ५ फुटाची जागा हातवारे हलवत, जोरात आवाज काढून शेवटी काहीतरी शिवी वजा शब्द उच्चरले कि ते - "चहा" व्यक्तिमत्व. या उलट जर व्यक्ती ४ वेळा शिंका देतेय आणि त्याही हळू-हळू त्यातही मान आणि जास्तीत जास्त हात हलवते ते कॉफी व्यक्तिमत्व. 

तर असे ते, तो आणि ती जेव्हा भेटतात, तेव्हा टपरी जाते आणि कॅफे येतो ; ४ वेळा कट मारणारा तो; एक एक घोट पित ४ तास बसतो. एका शिवीत आणि एका शिटीत सगळे सांगून मोकळे करणारा तो तासंतास शब्ध शोधत असतो. तीही मोकळी होते. तिलाही त्याची उर्मी भावते आणि गर्मीची उब हवी हवीशी वाटते. 

शेवटी त्याचं आणि तिचं शुभमंगल वाजलं कि लोक भेटायला येतात आणि त्यांना ते दोघे अगत्यानं विचारतात: "चहा की  कॉफी?"  



अडथळा

विजय - वर्गातल्या मोजक्याच हुशार मुलांमधला, मध्यम उंचीचा, गोरा, आणि मितभाषी मुलगा.  कुठल्याही स्कॉलर मुला मध्ये असणारे सगळे गुण ह्याच्या ...